‘घाशीराम कोतवाल’ ह्या नाटकाबद्दल आपले काय मत आहे? तेंडुलकरांना ह्या नाटकातून कोणता संदेश द्यायचा होता?
मी 'घाशीराम कोतवाल' या नाटकात काम करत होतो. मी त्या नाटकाचे मूळ संचातील लोकांबरोबर अंदाजे ७५ प्रयोग केले आहेत. ते नाटक अर्थातच भारतीय रंगभूमीवर अत्यन्त महत्वाचे मानले जाते. तेच माझे मत आहे. मी हे नाटक पाहून नितांत बदललो. प्रचंड भारावलेल्या अवस्थेत मी ते नाटक पाहून रंगमंदिरातून बाहेर पडलो होतो. आशय, अभिनय आणि आकृतिबंध हे अचंबित करणारे होते. त्यातील संगीत आणि नृत्य तर लाजबाब होते. विजय तेंडुलकर यांचे लेखन, डॉ.जब्बार पटेल यांचे दिग्दर्शन, भास्कर चंदावरकर यांचे संगीत, कृष्णदेव मुळगुंद यांचे नृत्य, समर नखाते यांची प्रकाशयोजना असे सर्व घटक मिळून आलेले होते. त्यात डॉ.मोहन आगाशे यांचा नाना फडणवीस, रमेश टिळेकर यांचा घाशीराम कोतवाल, श्रीराम रानडे यांचा सूत्रधार तर रवींद्र साठे आणि चंद्रकांत काळे यांचे मुख्य गायन असे एकजिनसी होते की याचे अक्षरशः गारूड व्हायचे. या नाटकात नाटक या माध्यमाची अशी सर्व बलस्थाने होती.
या नाटकाच्या विषयक खूप उलटसुलट सतत लिहिले गेलेले आहे. या नाटकावरून गदारोळ झाले आहेत. नाना फडणवीस यांची तसेच एकूण ब्राम्हण समाजाची बदनामी केली जात आहे अशी हाकाटी पिटली गेली. अस्मिता दुखावण्याची आणि त्याचे राजकारण करण्याची ती सुरुवात होती. वस्तुतः त्या नाटकात सत्ता आणि हिंसा हा प्रधान विषय आहे. त्या जोडीने लैंगिकता आणि अधःपतन हे विषय त्यात आहे. या साऱ्या पोटी माणसाचे जनावर कसे होते हा तेंडुलकरांनी विषय हाताळला होता. तो प्रेक्षकांना हादरवून टाकत असे. लोककला आणि लोकसंगीत याचा लवचिक वापर या नाटकात होता. त्या द्वारे ही कथा मांडली जात असे. १८१८ ला पेशवाई बुडाली आणि इंग्रजांनी राज्य स्थापन केले . त्या उत्तरार्धात घडणारी ही राजकीय आणि सामाजिक वेध घेणारी भेदक कथा होती.
माझ्या मते संदेश वगैरे तेंडुलकरांना द्यायचा नव्हता तर या अधःपतनाचे दर्शन त्यात घडवायचे होते. हे सत्य नग्न आणि अक्राळविक्राळ होते ते धीराने नाटकातून त्यांना उलगडायचे होते. बंडखोर कलाकार आधीच्या साऱ्या चौकटी मोडून टाकत असतो. तसे तेंडुलकर करत होते.
याबाबत मी 'तेंडुलकर आणि हिंसा' (काल आणि आज) हा माहितीपट केला आहे. तो युट्युबवर आहे. तो अवश्य पाहावा ही विनंती.
Comments
Post a Comment