नारायणराव बल्लाळ पेशवे

विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ 
          
नारायणराव बल्लाळ पेशवे (१७५५-१७७३)- पांचवा पेशवा. नानासाहेब पेशव्यांचे हे धाकटे पुत्र: हे स्वभावाचे तापट व स्नानसंध्याशील असून पोरवयामुळें त्यानां पेंचपांच, भारदस्तपणा व सारासार विचार कमी होता. यांचा जन्म ता. १०-८-१७५५ रोजी होऊन, मुंज २८ मे स. १७६२ त दादासाहेबांच्या हातून झाली. यांचें लग्न २२ एप्रिल १७६३ रोजीं सिंहगडास कृष्णाजी हरि साठे (तपकीर गल्लींतील) यांच्या कन्येशी होऊन तिचें नांव गंगाबाई ठेवण्यांत आलें; एकदां गुलटेकडीवर साठणारी पहात असतां एक हत्ती माधवराव व नारायणराव बसले होते तिकडे चालून आला. नारायणराव उठून जाऊं लागले तेव्हा माधवरावांनीं, नारायणा, जाऊं नकोस, गेल्यास तुझ्याबद्दल तवारखकार काय म्हणतील? असें म्हटल्यावर हे तेथें बसून राहिले. यावरून ग्रँटडफ म्हणतो कीं, जर ते जगते तर धाडसी बनण्याचा संभव होता. परंतु १८ व्या वर्षीच त्यांचा अंत झाल्यानें त्यांच्या गुणावगुणाबद्दल ठाम मत देतां येणें शक्य नाहीं.

माधवरावांनी आपल्या मृत्युसमयीं दादासाहेबांच्या हाती नारायणरावांचा हात देऊन, एकमतानें चालण्याबद्दल बापू, नाना व मामा पेठे यांच्यादेखत त्यांनां सांगितलें व तें दादानीं कबूल केलें. बापूनेंहि वचन दिलें कीं, जिवांत जीव असे तोपर्यंत मी नारायणरावांस अंतर देणार नाही. नंतर श्रीमंतानीं कैलासवास केला. त्यांच्याबरोबर रमाबाई सती गेल्या; धर्मशिळेवर उभ्या असतांना त्यानींहि नारायणरावांचा हात दादांच्या हातीं देऊन वडीलपणें सर्वांचा संभाळ करण्यास सांगितले (१८-११-१७७२). त्यांचें उत्तरकार्य नारायणरावांनीच केलें. नंतर मंडळी पुण्यास आली. वाटेंत नारायणरावांचा व दादांचा संकेत ठरला कीं, झालें तें गेलें; यापुढें दोघांनीं एकविचारें सर्व गोष्टी व कारभार एके ठिकाणीं बसून करावा. ``द्यावें’’ नारायणरावांनीं व ``देवावें” दादांनीं करावें. परंतु हा ठराव थोड्याच दिवसांत फोल झाला. सातार्‍याहून पेशवाईची वस्त्रें आणण्यास नारायणराव पुण्याहून निघाले. (१-१२-१७२) तेव्हां दादानीं बरोबर चलण्याविषयी त्यांनी आग्रह केला. त्यावेळीं दादानीं स्वत:स २२ लक्षांचा सरंजाम देण्याबद्दल हट्ट घेतला. परंतु नारायणराव व इतर मुत्सद्दी यांनीं त्यांची युक्तीनें समजूत घातली. सातार्‍यास पोंचल्यावर, वेण्येच्या कांठीं मुक्काम करून नारायणरावानीं छत्रपतींनां व त्यांच्या राण्यांनां मेजवानी व नजरा केल्या व छत्रपतींनीं नारायणरावांनां पेशवाईचीं वस्त्रे व शिक्के-कट्यार आणि जरीपटका दिला (१३ डिसेंबर, १७७२) मग श्रीमंत पुण्यास परत आले.

श्रीमंतांचा प्रथम नाना व फडके यांच्यावर बराच विश्वास होता; मात्र बापूवर फारशी मर्जी नव्हती. पुढें एकदां तर त्यानीं बापूंचें न ऐकतां त्यांस दुरुक्ति बोलून त्यांचें मन दुखविलें. त्यामुळें त्या पाताळयंत्री मुत्सद्यानें उदासीन राहून बहुतेक कारभार अंगाबाहेर टाकला; या सुमारास हलक्या लोकांची रीघ श्रीमंतांजवळ पडत चालली व ते त्यांच्या गोष्टी ऐकूं लागले; त्यानीं बाबाजी बर्वे यास कारभार सांगितला. या सुमारास फिरंग्यांनीं वसई, साष्टी वगैरे आपला गेलेला प्रांत परत मिळविण्याची जय्यत तयारी करून विजय दुर्ग व रत्नागिरी बंदरांत ते ससैन्य उतरले. त्यामुळें पुण्यास आरमाराचे सरदार होते त्यांनां श्रीमंतांनीं आणखी जास्त मदत देऊन तिकडे पाठविलें, परंतु त्यापूर्वीच कृष्णआजी धुळप यानें शिलकी आरमारासह फिरंग्यांचा सडकून पराभव करून मालवणापर्यंत त्यांचा पाठलाग केला (जाने. १७७३).

इकडे दादा व आनंदीबाई यांच्या, आपल्याविरुद्ध मसलती चालल्या आहेत असें कोणी कळविल्यावरून, पुरती चौकशी न करितां व बापू आणि नानांच्या मताविरुद्ध श्रीमंतांनीं दादांनां सहकुटुंब कैदेत टाकिलें (एप्रिल). या सुमारास रायगडच्या किल्लेदारानें शिंद्यांच्या तर्फे कांहीं गडबड केल्यानें श्रीमंतानीं छत्रपतींना ४० हजार रुपये देऊन रायगड आपल्या हाती घेतला.

तिकडे उत्तरेकडे सुजाउद्दौला व इंग्रज यांच्या चिथावणीवरून दिल्लीच्या बादशहानें नजीबखानाच्या मार्फत तेथे असलेल्या मराठ्यांच्या (होळकर व बिनीवाले)वर स्वारी करविली; परंतु तींत त्याच्या पराभव झाला. या लढाईत कांहीं कवायती इंग्रजी पलटणेंहि बादशहाच्या बाजूस होतीं. बादशहानें घाबरून तह करून पूर्वीप्रमाणें वागण्याचें कबूल केलें. पुढें मराठ्यांनी सुजाउद्दौला, इंग्रज व रोहिले यांची जूट मोडण्यासाठी रोहिल्यांवर स्वारी केली व त्यांचा मोड केला; तेव्हां हाफिज रहिमत रोहिला हा तहास तयार झाला. इतक्यांत सुजा व इंग्रज त्याच्या मदतीस आले. या सर्वांची फौज ६०।७० हजार व मराठे ३० हजार असल्यानें आणि पावसाळाहि नजीक आल्यानें मराठे दुआबांतून परतून दिल्लीस आले.

नागपूरकर भोंसल्यांच्या घरांतहि पेशव्यांप्रमाणें यावेळीं भाऊबंदकी माजली होती. जानोजी वारल्यावर माजी पेशव्यानीं सेनासाहेबसुभ्याची वस्त्रें रघुजीस देऊन मुधोजीस त्याचा कारभारी केलें होतें. पुढें मुधोजी हा दादासाहेबांच्या पक्षास मिळाला व त्याचा भाऊ साबाजी हा माधवराव व नारायणराव यांनां मिळाला. यावेळीं नारायणरावानीं रघुजीचें सेनासाहेबसुभ्याचें पद काढून तें साबाजीस दिलें व त्याच्या कुमकेस पुण्याहून सैन्यहि पाठविलें. त्याच्या साहाय्यानें तिकडे साबाजीने मुधोजीशीं भांडण चालविलें (मे).

इकडे दादानीं मसलत करून कैदेंतून सुटण्याचा प्रयत्न चालविला. गुप्तपणें ठिकठिकाणी फौज जमवून, मुधोजीशी त्याच्या वकिलामार्फत पत्रव्यवहार ठेवला. तसेंच हैदराच्या पुण्यास असलेल्या वकिलाच्या द्वारें खटपट सुरू केली. इतक्यांत श्रीमंत हे मातोश्रीस भेटण्यांस गंगापुरास गेले. ही संधि साधून दादानीं शनवारवाड्यांतून पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु आयत्या वेळीं बेत फुटला व नारो आप्पाजी यानें त्यानां पकडून पुन्हां कैदेत ठेविलें. ही बातमी समजतांच श्रीमंत ताबडतोब पुण्यास आले. हैदराकडील फितुराचे कागद पकडून त्यानीं त्याच्या वकिलास व इतर फितुर्‍यास कैदेंत टाकून दादांची कैद कडक केली व त्यांची जमलेली फौज उधळून लाविली.

हैदरानें वरील आगळीक करून, शिवाय माधवरावांच्या वेळच्या आपल्या पराजयांचे उट्टें काढण्यासाठीं त्यानें या सालीं पेशव्यांविरुद्ध तयारी चालविली. त्यामुळें दसराअखेर त्याच्यावर स्वारी करण्यासाठीं श्रीमंतांनीहि तयारी चालविली आणि उत्तरेकडून बिनीवाले व होळकर यांनां परत बोलाविलें. त्यांनां यावेळीं परत बोलाविणें योग्य नव्हतें. कारण यावेळीं उत्तरेकडे मोंगल, रजपूत, इंग्रज, पठाण, रोहिले, बुंदेले हे सारे एक होऊन मराठ्यांविरुद्ध उठले होते. अर्थात वरील मराठी सेनापतींच्या मदतीस उलटून इकडूनच आणखी फौज जावयास पाहिजे होती; म्हणजे वरील शत्रूंवर दाब बसून आज तीन वर्षांत मिळविलेला आग्रा, दिल्ली, मथुरा, कनोज वगैरे प्रांत हातांत राहिला असता. हैदराची समजूत चतुराईनें पाडतां आली असती. परंतु हें सामर्थ्य सांप्रतच्या श्रीमंतांस नव्हतें व त्यांच्या कारभार्‍यांनींहि हें लक्षांत घेतलें नाही असें रा. खेर यांनीं म्हटलें आहे. तिकडे मुधोजीनें एलिचपूरच्या नबाबाच्या साहाय्यानें साबाजीचा पराभव केला; तेव्हां त्याच्या मदतीस स्वत:च जाण्याचें श्रीमंतांनीं ठरविलें, तत्पूर्वीच त्यांचा अंत झाला.

याच सुमारास चांद्रसेनीय कायस्थांचें प्रकरण उपस्थित झालें. त्याबद्दलचा कै. खेरशास्त्री यांचा (ऐ.ले. संग्रह. भाग चवथा, पृ. १९५६-६०) उतारा पुढें देतों. ``प्रभू लोक आपण क्षत्रिय असून आपणांस वेदोक्त कर्माचा अधिकार आहे असें म्हणून त्याप्रमाणें वागणूक करीत असत. पूर्वीपासून या बाबतींत ब्राह्मणांची व त्यांची कलागत होत आली असून अनेक वेळां उभय पक्षांकडून सरकारांत फिर्यादीहि गेल्या. परंतु त्या त्या वेळचे अधिकारी या जातीजातींच्या कलहाचा निकाल कोणच्याहि पक्षाचा अभिमान न धरितां, पूर्वी चालत आलें आहे तसें चालवावें... असा करून ती वेळ भागवून नेत. प्रस्तुत ब्राह्मणांकडून प्रभूंवर सरकारांत फिर्याद आल्यावरून नारायणरावसाहेबांनीं प्रभू क्षत्रिय नाहींत, त्यांस वेदोक्त कर्माचा अधिकार नाहीं, शूद्राप्रमाणें त्यांनीं वागावें असा ठराव केला व त्या अर्थाचा प्रभूंपासून नऊ कलमांचा कतवा लिहून घेतला, प्रभूंचें म्हणणें, `आपण कतबा खुषीनें दिला नाही... पेशव्यानीं... नानाप्रकारें जुलूम केला त्यामुळें निरुपाय होऊन... लिहून दिला.’ यामुळें ती सारी जात खवळून गेली व इतिउत्तर तिनें दादांचा पक्ष धरिला. दादा व आनंदीबाई यांचा अनन्वित छळ पेशव्यानीं केल्याविषयीं प्रभूंनीं जे लेख लिहिले आहेत ते सर्व खरे आहेत असें आम्हांस वाटत नाही. सदर लेखांविषयीं आमचें (खरेशास्त्री) मत ग्रांट डफच्या मताप्रमाणेंच आहे. तें हेंच कीं, या पेशव्यांच्या हांतून मूलपणामुळें जे अल्पस्वल्प दोष घडले असतील, त्यांचे पक्षाभिमानास प्रवृत्त झालेल्या लोकांनीं तिखटमीठ लावून वर्णन केलें आहे.’’

पेशवे हे मुधोजीवर जाणार म्हणून त्यानां इकडेच अडकवून ठेवण्यासाठी व त्यांतल्यात्यांत दादानां मोकळे करण्यासाठी पुण्यास एक कट झाला, प्रथम याचें स्वरूप भयंकर नव्हतें. दादानां सोडवून लांब न्यावे व फौज जमविण्यास त्यास मदत करावी; त्यानीं फौज जमवून धामधूम केली कीं, पेशवे इकडेच अडकतील, असा हा कट होता. मुधोजीचे वकील व्यंकट काशी व लक्ष्मण काशी आणि दादांचा विश्वासु सरदार सखाराम हरि हे तिघे प्रभु या कटाचे मूळ उत्पादक होत. यापुढें या कटांत बडीं बडीं प्रस्थें मिसळून त्याचा पहिला रंग बदलून आतां निराळीच मसलत ठरली. ती म्हणजे नारायणरावांनां कैदेंत टाकून दादानां गादीवर बसवावयाचें. भवानराव प्रतिनिधि, सदाशिव रामचंद्र शेणवी, विठ्ठळ रायरीकर व सखाराम बापू हे यांत होते. सर्व व्यवस्था दादांच्या संमतीनें चालली. हा कट फार गुप्त व अत्यंत जलद झाला असावा. हा कट तयार होतो तोंच कांहीं दुष्ट लोकांनीं आनंदीबाईच्या संमतीनें किंवा आज्ञेनें त्या कटांत आणखी एक पोटकट उभा केला. तो म्हणजे श्रीमंतांस कैद करण्याऐवजीं ठार मारावें. या पोटकटाची बातमी दादानां किंवा मुख्य कटांतील माणसांनां माहित नसावी.

श्रीमंतांस धरण्याचें काम वाड्यावरील पहारा करणार्‍या गारद्यांच्या सुमेरसिंग, खरकसिंग, महंमद इसब या तीन जमातदारांवर सोंपविलें. त्यांनां दादांनीं स्वदस्तुरचा हुकूम दिला. त्यांत नारायणराव यांस ``धरावें’’ असें वाक्य होतें. परंतु पूर्वी ठरल्याप्रमाणें, आनंदीबाईनें तो हुकूम मागून घेऊन दादानां न कळत त्यांतील ``ध’’ चा ``मा’’ केला. गारद्यांस या कामासाठीं साष्टी, नगर व पुरंदर हे तीन किल्ले आणि पांच लक्ष रुपये देऊं केले होते. यांपैकी मुख्य कटवाल्यांनीं रक्कम कबूल केली असावी व पोटकटवाल्यांनीं किल्ले कबूल केले असावेत असे वाटतें. या कटात इतरहि गोष्टी अनुकूल बनल्या: पावसाळ्यामुळें फौजा घरीं गेल्या होत्या; पुण्यास ३।४ हजार फौज उरली होती. आपणांस कोणी कैद करील किंवा मारील अशी कल्पनासुद्धां श्रीमंतांस नव्हती; त्यामुळें ते गैरसावध होते. एकदां पर्वतीस बोथाटी खेळत असतां त्यानीं नाना फडणविसाचें पागोटें उडविलें व थट्टा केली; त्यावेळीं नानानीं ``श्रीमंतानीं माझें उडविल्यास हरकत नाही, स्वत:चे सांभाळावें’’ अशी सूचना त्यानां केली होती; पण तिकडे त्यांनीं फारसें लक्ष दिलें नाही. नानानां या पकडण्याची थोडीशी कुणकुण होती. गारदी दंगा करणार किंवा पेशवे कैद होणार या गोष्टी त्याकाळीं अश्रुतपूर्व नव्हत्या. कारण गारदी नेहमींच पैशासाठीं कटकटी करीत; तसेंच खुद्द थोरले माधवराव १ वर्ष व दादा तर ५ वर्षे कैदेत होते. त्यामुळें पकडण्याच्या कटाबद्दल फारशी काळजी कोणी (त्याचप्रमाणें नानानींहि) घेतली नाहीं. मात्र खरेशास्त्री म्हणतात त्याप्रमाणें मारण्याचा कट झाला आहे, याची कोणासच कल्पना नव्हती. ``गारद्यांच्या हातें पेशव्यांचा खून करण्यासारखी भयंकर मसलत कोणाहि मराठी मुत्सद्द्याच्यानें कबूल करवली नसती... यावरून बायकांच्या व अल्पबुद्धि दुष्ट लोकांच्या संमतीनें ती आयत्या वेळी ठरली असावी हें नि:संशय होय.’’

भाद्रपद शुद्ध १३ शके १६९५ (३० आगस्ष्ट १७७३) रोजीं सकाळीं कुलाब्याहून आलेल्या रघोची आंग्र्यांची भेट घेऊन व पर्वतीस जाऊन श्रीमंत वाड्यांत आले. वाटेंत त्यांस गारदी आज दंगा करणार म्हणून समजल्यावरून त्यानीं हरिपंत फडक्यास गारद्यांचा बंदोबस्त करण्यास सांगितलें. परंतु हरिपंतानें तात्काळ बंदोबस्त न करतां तो कोठें जेवावयास गेला, जेवणानंतर बंदोबस्त करण्याचें त्यानें ठरविलें; दंग्याबद्दल त्याला विशेष वाटलें नाहीं. वरील आज्ञा, तुळाजी खिदमतगार जवळ होता त्यानें ऐकून कटवाल्या मंडळीस कळवून लवकर कृत्य आटोपलें. तो फितुरी होता. दुपारी बारा वाजतां सुमेरसिंगादि मंडळीने ७००-८०० गारदी हजेरीच्या निमित्तानें एकत्र जमवून, दिल्लीदरवाज्यावर चाल करून व पहारेकरी कापून सर्वत्र आपल्या चौक्या बसविल्या आणि एकसारखी लुटालूट व कत्तल चालविली. देवघर झाडून लुटलें. ब्राह्मण ७।८ असामी, दोन गाई, दोन कुणबिणी, यांखेरीज चौकीदार मारले गेले. सुमेरसिंग व महंमद इसब एक टोळी घेऊन श्रीमंतांचा शोध करीत होते. श्रीमंत झोंपले होते; ते दंग्यानें जागे होतात तोंच सुमेरसिंगादि मंडळी जवळ येऊन ठेपली. यावेळीं श्रीमंतांच्या जवळ एक दोन पुरभय्ये होते; ते पळाले तेव्हां श्रीमंत हे दादांच्या खोलींत जाऊन त्यानां मिठी मारून प्राण वांचविण्याबद्दल काकुळत करूं लागले. तों गारदी आले; दादानीं त्यानां पेशव्यांस न मारण्याबद्दल सांगितलें तेव्हां त्यांनीं आतां आम्हास मागें सरतां येत नाही, पेशव्यास तुम्ही सोडा, नाही तर दोघेही मराल असें सांगितलें. त्याचवेळी सुमेरसिंगानें एक वार केला, त्यानें दादांस जखम झाली; तेव्हा त्यानीं पेशव्यांस लोटून दिलें. इतक्यांत तुळाजी पवार यानें पेशव्यांचें पाय धरून खालीं पाडले; तो चापाजी टिळेकर नांवाचा एक विश्वासू खिदमतगार त्यांच्या अंगावर पडला; परंतु कांहीं उपयोग न होतां गारद्यांनीं त्या दोघांनां ठार केलें, इच्छारामपंत ढेरेहि यावेळीं मारला गेला. नंतर दादा सदरेस आले, त्यांच्या नांवाची द्वाही वाड्यांत गारद्यांनीं फिरविली. पेशव्यांची स्त्री गंगाबाई माहेरून ताबडतोब आली व सती जाण्याबद्दल हट्ट घेऊन बसली; तेव्हां तिला पार्वतीबाईनें, तुला कांहीं दिवस गेले आहेत असें सांगून खोलीत कोंडलें (कोठें आनंदीबाईनें कोंडलें असेंहि म्हटलें आहे). वाड्यांत गारद्यांचा दंगा झाल्याचें शहरांत समजलें. तेव्हां लोक घाबरले व बापू, नाना, मामा वगैरे मुत्सद्दी कोतवालचावडींत जमा होऊन त्यांनीं शहरची नाकेबंदी केली. परंतु वाडा गारद्यांच्या ताब्यांत राहिला व आंतील बातमी बाहेर समजेना. वाड्यास तोफा लावून गारद्यांस बाहेर काढावें असें कोणी सुचविलें, परंतु मुत्सद्द्यांस ते पटेना. कारण वाड्यांत श्रीमंत अद्यापि जिवंत असतील असेंच त्यांनां वाटत होतें. इतक्यांत दादांच्या स्वदस्तुरची चिठ्ठी बापूस आली कीं, ``आतां व्यर्थ खटपट कशास करिता? चिरंजीव राव गारद्यांच्या कटकटीत मारले गेले.’’ मग बापू वाड्यांत गेला व दादांस भेटला. श्रीमंतांस कैद करावें येथपर्यंतच्या मसलशीस बापूची संमती होती, पण घडलेली भयंकर गोष्ट पाहून त्याचें मन विटलें. दादानें त्यास कारभार हाती घेण्यास सांगितलें, तेव्हां आपले शरीरीं समाधान नाहीं, फडणविसास बोलवा. असें म्हणून तो घरी गेला. सायंकाळी त्रिंबकमामास बोलावून दादानीं श्रीमंतांच्या शवाची व्यवस्था करावयास सांगितलें; त्यावर मामानें मध्यरात्रीं शवाचें दहन करविलें. [नारायणराव पेशव्यांची बखर; खरे- ऐ.ले.सं. भा. ४; ग्रँटडफ, पेशव्यांची बखर]

Comments

Popular posts from this blog

बाळाजी आवजी चिटणीस