पानिपतचें युद्ध
विभाग सतरावा: नेपाळ- बडोदें
पानिपतचें युद्ध- पानिपतास झालेली तिसरी लढाई. या प्रसंगाची सविस्तर हकीकत अन्यत्र येणार असल्यानें येथें फक्त तिचा थोडासा सारांश दिला आहे.
युद्धाचीं कारणें.- अब्दालीनें १७५५ त नजीबखान यास दिल्लीच्या बादशाहीचा सेनापति केलें होतें. त्यास १७५७ त वजीर गाजीउद्दीनाच्या सांगण्यावरून राघोबादादा पेशवे यानीं पदच्युत केलें. सरहिंद येथें असलेल्या अब्दालीच्या सुभेदारास गाजीच्याच सांगण्यावरून दादानीं हांकलून पंजाब दुराण्यांच्या हांतून सोडविला (१७५८). गाजीच्याच सांगण्यावरून दत्ताजी शिंद्यानें नजीबखानावर रोहिलखंडांत स्वारी केली (१७५९). मराठयांचें वर्चस्व दिल्लीदरबारांत होऊन, पातशहा काढणें अथवा ठेवणें हा त्यांच्या हातचा मळ झाला. त्यांनीं मनांत आणल्यास मुसुलमानी पातशाही खालसा करण्याची हिंमत त्यांच्या अंगीं होती ही गोष्ट मुसुलमान असह्य झाली. या कारणांनी ही लढाई किंवा भाऊगर्दी (ऑगस्ट १७५९ ते मार्च १७६१)
पानपत येथें झाली.
अब्दाली येतो.- अब्दालीच्या मनांत मराठयांचा दिल्ली येलील वचरष्मा काढून तेथें आपली सत्ता स्थापावी व मग संधि साधल्यास आपण दिल्लीचा पातशहा व्हावें असें होतें. पण मध्यंतरी मराठयांचा कांटा होता. पातशहाची सावत्र आई मलिका अज्जमानी, नजीबखान व थोडाबहुत स्वत:
पातशहा दुसरा अलमगीर ही मंडळी मराठयांच्या विरुद्ध होती. त्या सर्वांचें सूत्र पुष्कळ दिवसांपासून अब्दालीशीं होतें. दत्ताजीनें नजीबवर स्वारी केली तेव्हां त्यानें अब्दालीस ताबडतोब बोलाविल्यावरून तो तात्काळ अटक ओलांडून आला. ही बातमी ऐकून दत्ताजीनें नजीबानें लाविलेलें तहाचें बोलणें मान्य केलें. इतक्यांत अलमगीरचा अब्दालीशीं चाललेला गुप्त पत्रव्यवहार सांपडल्यानें गाजीउद्दीनानें त्याचा वध केला व शहाअलमास गादीवर बसविलें. अब्दालीनें लाहोर घेऊन, यमुनेच्या कांठीं असलेल्या दत्ताजीच्या तोंडावर थोडी फौज ठेवून यमुना ओलांडली व मग आपली पिछाडी बळकट करून परत यमुना ओलांडून दिल्लीजवळ त्यानें दत्ताजीच्या बगलेवर एकाएकीं हल्ला केला. त्यांत दत्ताजी ठार होऊन त्याच्या सैन्यानें माघार घेतली (जानेवारी, १७६०). यावेळीं मल्हारराव होळकरास मदतीसाठीं निकडीची अनेक बोलावणीं गेलीं असतां, तो गेला नाहीं. या पानिपत प्रकरणांत मल्हारजीनें अथपासून इतीपर्यंत अंग चोरून काम केलें आहे. दत्ताजीचा पराभव झाल्यावर मग मल्हारजीनें अब्दालीची रसद मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांत त्याला अब्दालीनें पिटाळून लाविलें.
भाऊसाहेब निघतात.- शिंदेहोळकरांच्या पराभवाची बातमी ऐकल्याबरोबर पेशव्यांनीं भाऊसाहेब यांस उदगीरहून पटदूर येथें परभारें बोलाविलें. त्यापूर्वी त्यानीं उद्गीरच्या लढाईंत निजामाचा पुरा पराभव केला होता. पटदुरास पेशवे पूर्वीच आले होते. एक आठवडा वाटाघाट होऊन भाऊसाहेब हे विश्वासरावासह अब्दालीवर निघाले (मार्च). त्यांच्या बरोबर मेंहेंदळे, समशेरबहाद्दर, विंचूरकर पुरंदरें वगैरे सरदार होते. शिवाय चंबळा (चमेली) ओलांडण्यापूर्वीच होळकर, शिंदे, गायकवाड, पवार, बुंदेले वगैरे सरदार त्यांनां मिळाले. रजपूत राजे मात्र त्यांनां मिळाले नाहींत; याचें कारण दोन वर्षांपूर्वीं राघोबादादानीं व जयाप्पा शिंद्यानें त्यांचा पुरा पराभव केला होता. हें शल्य त्यांच्या मनांत होतें. सार्या पानिपतच्या युद्धांत या रजपुतांनीं मराठयांनां एकदांहि मदत केली नाहीं किंवा रसदहि पुरविली नाहीं. सुरजमल्ल जाट हा मल्हारजीमुळें भाऊसाहेबानां मिळाला. या दोघांचें म्हणणें, गनिमीकाव्यानें लढून अब्दालीला माघार घ्यावयास भाग पाडावें असें होतें. परंतु इब्राहिमखान गारद्याचें म्हणणें दुराणीशीं समोरासमोर लढाई द्यावी असे होतें. त्यांची एकवाक्यता भाऊसाहेबानां करतां आली नाहीं. शिवाय नुक्ताच उद्गीर येथें इब्राहिमखानाच्या तोफखान्यामुळें व कवाइती पलटणामुळें त्यानां जय मिळाल्यानें त्यांचा कल खानाकडेच झुकला. त्यानीं दिल्लीस येऊन व तोफांचा मारा करून किल्ला घेतला. नंतर पावसाळा आल्यानें भाऊसाहेबानीं आपली छावणी दिल्लीस केली. परंतु पुढें पुढें रसद मिळेना व जवळचा पैकाहि संपला. तेव्हां बादशाही दरबाराच्या दिवाणखान्याचें रुपेरी छत त्यानीं काढून त्याचें नाणें पाडिलें. यामुळें सुरजमल्ल रागाऊन निघून गेला; त्याला फोडण्याचा प्रयत्न अब्दालीनें केल्याचा उल्लेख आहे.
डांवपेंच.- भाऊसाहेब हे दिल्लीस असतां, अब्दाली हा गंगाकाठीं अनूपशहर येथें होता. त्यानें नजीबच्या मार्फत सुजाउद्दौला यास आपल्याकडे वळवून घेतलें. मराठयांनीं आपल्या बापाच्या विरुद्ध मागें कारवाई केल्याचा दंश सुजाच्या मनांत होता. परंतु उघडपणें मराठयांशीं वैर करण्याचीं त्याची हिंमत नसल्यानें अगदीं शेवटच्या दिवसापर्यंत त्यानें अब्दाली व मराठे यांच्यांत तडजोड घडवून आणण्याचा आव घालण्याचा व मराठयांनां नादीं
लावण्याचा धूर्तपणें प्रयत्न चालविला होता. त्याला फोडण्याचा-निदान तटस्थ ठेवण्याचा-प्रयत्न भाऊसाहेबानीं केला; परंतु तो फुकट गेला. एवढेंच नाहीं तर शहाअलम दिल्लीस नसल्यानें भाऊसाहेबानीं जवानबख्त यास पातशहा करून सुजास वजीर केलें; तरीहि सुजा वळला नाहीं. नंतर भाऊसाहेबानीं नारो शंकरास दिल्लीस ठेवून स्वत: कुंजपुरा घेतला. हें समजतांच अब्दालीनें अनुपशहराहून निघून व एकीकडे भाऊसाहेबांनां तहाच्या बोलण्यांत अडकावून, मोठी खटपट करून यमुना ओलांडली (ऑक्टोबर). दुसर्या दिवशीं दोन्ही सैन्यांच्या बिनीची चकमक झाली. यावेळींच अब्दालीवर चढाई करावी असा इब्राहिमखानाचा सल्ला मल्हारजीनें मोडून काढला. तेव्हां दक्षिणेस हटून भाऊसाहेबानीं पानिपत येथें छावणी करून, तिच्या भोंवतीं खंदक खोदला व मोर्चेबंदी केली. अब्दालीनेंहि मराठयांच्या समोर, पानिपत ते दिल्ली या रस्त्याच्या मध्यें छावणी ठोकून मोर्चेबंदी केली व मराठयांचा दिल्लीचा मार्ग रोखला. त्याचें जवळ जवळ १ लाख, ३० हजार खडें सैन्य व तोफखाना होता; शिवाय इतकेच बाजारबुणगे होते. मराठयांचें सैन्य तोफखान्यासह सारें ७० हजार म्हणजे अब्दालीच्या निम्याइतकें होतें.
अखेरचा प्रयत्न.- अब्दालीची रसद गोविंदपंत बुंदेले नेहमीं लुटीत असे, पण एकदां गैरसावध असतां अब्दालीच्या एका सरदारानें त्याला ठार केलें. त्यामुळें तहाची आशा संपली. इतक्यांत दिल्लीहून खजिना व रसद घेऊन येणारी मराठयांची टोळी चुकून अब्दालीच्याच गोटांत गेल्यानें, त्याचा आयता फायदा झाला. मराठयांकडे अन्नाची टंचाई पडूं लागली. तेव्हां एके दिवशीं मल्हारजीनें अब्दालीच्या डाव्या बगलेवर अचानक हल्ला करून त्याची फळी फोडली (२६ नोव्हें.). त्यानंतर दोहों सैन्यांत किरकोळ चकमकी होत. पुढें २३ दिसेंबरला शहावली (अब्दालीचा वजीर) हा बाहेर पडला असतां, मराठयांनी एकदम त्याच्यावर हल्ला केला. तेव्हां अब्दालीचीहि फौज त्याच्या मदतीस आली; परंतु मराठयांनीं तिला पिटाळून लाविली.
मात्र या लढाईंत बळवंतराव मेहेंदळें पडले. अब्दालीस, सुजा व नजीब यांनीं मराठयांवर एकदम चढाई करण्यास आग्रह केला. पण त्यानें अन्नाच्या टंचाईनें मराठे गाय बनल्यावरच चढाई करण्याचें ठरविलें. त्याच्या अजमासाप्रमाणें पुष्कळ दिवस उपसा काढून मराठे कंटाळले व अखेर त्यांच्या विनंतीवरून भाऊसाहेबांनीं १४ जानेवारी १७६१ रोजीं पहाटें अब्दालीवर सर्व सैन्यानिशीं चाल केली. प्रथम तोफांची सरबत्ती होऊन मग हातघाईची लढाई सुरू झाली. दुपारपर्यंत इब्राहिखानाच्यां अर्ध्या पलटणी मारल्या गेल्या, पण त्यानें समारेच्या ८ हजार रोहिल्यांस कापून आपल्या बाजूला लढाई जिंकली. भाऊसाहेब, विश्वासराव व पवार हे मध्यें होते; त्यांनीं अब्दालीच्या करमण्यांतील वजीराची फळी फोडली. तेव्हां अब्दालीनें (हा मागें राहून युद्धाचें निरीक्षण करीत होता) दहा हजार स्वार वजीराच्या मदतीस धाडले. अब्दालीच्या डाव्या (नजीब व सुजा यांच्या) बगलेनें समोर होळकर व समशेर-बहाद्दरावर हल्ले केले. परंतु त्यांनीं ते परतविले. या दिवशीं मराठयांची सर्व फौज (मल्हाररावाशिवाय) जिवावर उदार होऊन लढली. आतांपर्यंत मराठयांचाच जय होता. इतक्यांत सायंकाळच्या सुमारास दुर्दैवानें विश्वासरावानां गोळी लागली व ते ठार झाले. तें पाहून मल्हारजीस बायकामुलांनां परत नेण्याचें काम सांगून भाऊसाहेब हत्तीवरून उतरून घोडयावर बसून गर्दीत शिरले. दोन्ही खाविंद दिसेनासे झाल्यानें मराठी फौजेचा धीर सुटला व तिनें पाय मागें घेतला. त्यामुळें सर्व पारडें फिरलें. अब्दालीनें एकदम हल्ले करून मराठयांचा नाश केला. मल्हारजी बरोबरच गायकवाड विंचूरकर, राजेबहाद्दर हे पळाले. जनकोजी शिंदे, समशेरबहाद्दर व इब्राहिमखान हे जखमी होऊन हातीं लागल्यावर गिलच्यानीं त्यांचा खून केला. यशवंतराव पवार व भाऊसाहेब हे रणांगणांत पडले. मराठयांपैकीं फक्त १/४ लोक परत आले. नानासाहेब हे भाऊसाहेबांचीं निकडीची बोलावणीं आल्यावरून फौजेसह त्यांच्या मदतीस निघाले होते; परंतु वाटेंतच त्यानां हें दु:खकारक वर्तमान समजलें. त्या, दु:खानें ते पुण्यास परत आल्यावर थोडयाच दिवसांनी वारले. तिकडे अब्दालीनें शहाअलमास गादीवर बसवून, सुजास वजीर व नजीबास सेनापति करून तो स्वदेशीं परत गेला. त्याचें या मोहिमेंत इतकें नुकसान झालें की त्यानंतर तो ११ वर्षे जगला असतांहि त्यानें पुन्हां हिंदुस्थानास फारसा त्रास दिला नाहीं. (पानिपतची, भाऊसाहेबांची, पेशव्यांची व काशिराजाची बखर.)

Comments
Post a Comment